उत्तराखंडमधील जोशीमठ हे छोटंसं डोंगराळ शहर सध्या विशेष चर्चेत आहे. “विकास’ या शब्दाची नव्यानं व्याख्या केली पाहिजे किंबहुना ती वेगळी आहेच; पण जी रूढ व्याख्या आहे ती चुकीची आहे, हे पुराव्यानिशी दाखवून देणाऱ्या घटना या शहरात घडतायंत.
दोन दिवसांपूर्वी सरकारी अधिकारी येतात आणि घराची पाहणी करून सांगतात, “तुम्हाला अजिबात धोका नाही…’ पण तिसऱ्याच दिवशी घराला भेगा पडतात आणि अधिकारी येऊन सांगतात, “चला, लवकर घर खाली करा!’ अनेकजण घरात सगळंकाही असून शेजाऱ्यांनी दिलेल्या जेवणावर गुजराण करतायत. शेजाऱ्यांनासुद्धा आपला नंबर केव्हा लागेल, हे सांगता येईनासं झालंय. संपूर्ण शहरच एखाद्या रात्री न सांगता जमिनीच्या पोटात गडप होईल की काय, अशी भीती सगळ्यांनाच आहे. परंतु एवढं सगळं होऊनसुद्धा आपण वास्तव स्वीकारायला तयार नाही.
सध्याचा विकास (खरंतर “वाढ’) तंत्रज्ञानाधारित आहे, असं मानलं तरी तंत्रज्ञान विज्ञानाधारित आहे, एवढं तरी मान्य असायला हरकत नसावी. परंतु जेव्हा परिसरविज्ञान किंवा पर्यावरण असा शब्द समोर येतो, तेव्हा मात्र आपण ते विज्ञान असल्याचंच मुळासकट नाकारतो… का? कारण हे विज्ञान बाजारमूलक विकासाच्या संकल्पना बदलण्याची मागणी करतं. “जान है तो जहान है’ असं सांगतं. स्थलांतरासाठी 50 हजार आणि भरपाई म्हणून एक लाख रुपये घेणाऱ्या जोशीमठ शहरवासीयांना हे पटलंय.
2013 मधला केदारनाथचा महापूर आठवून जोशीमठ शहरवासीय हादरलेत. परंतु हे शहर विभागून तीन ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या योजनेला मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. प्राप्त माहितीनुसार, ब्रिटिशांच्या काळात दोन भूवैज्ञानिकांनी जोशीमठ गावाचं सर्वेक्षण केलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की, हे संपूर्ण गावच भूस्खलनामुळे घरंगळलेल्या खडकांवर वसलेलं आहे. या परिसरातील अनेक गावं अशीच वसली आहेत; परंतु लहान गावांची लोकसंख्या कमी असल्यामुळे आणि स्थानिक कच्चा माल वापरूनच घरं बांधल्यामुळे त्यांना धोका जाणवत नाही.
जिथं प्रचंड प्रमाणात सिमेंट कॉंक्रेटीकरण झालं आणि लोकसंख्येचा बोजाही वाढत गेला, अशी जोशीमठसारखी ठिकाणं मात्र धोक्याच्या छायेत आहेत. भूस्खलनामुळे निसटलेल्या खडकांचा पाया बनवून तीन-चार मजली इमारती उभ्या केल्यावर दुसरं काय होणार? या इमारती क्रमाक्रमानं डोंगराच्या पोटात गडप होताना पाहणं आता नशिबी आलंय. डोंगराळ भागाचे विकास आराखडे तयार करताना नैसर्गिक भूरचनेचा किती बारकाईने अभ्यास केला पाहिजे, हे जोशीमठच्या घटनांमधून दिसून येतंय. हिमालयाप्रमाणेच सह्याद्रीमध्येही मनाला येईल त्या ठिकाणी सपाटीकरण करून बांधकामं करण्याचा सपाटा सुरू आहे. हिमालय तर “सर्वांत तरुण पर्वत’ मानला जातो आणि तो ठिसूळही आहे.
देवदर्शनासाठी असो वा पर्यटनासाठी असो, देवभूमीकडे जाणाऱ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटींनी वाढली; परंतु डोंगरावरच्या पठारांची लांबी-रुंदी तेवढीच राहिली. मग सपाटीकरण करून बांधकामं वाढत गेली. वाहतुकीची साधनंही काळानुसार बदलली आणि त्यामुळेही डोंगर पोखरणं वाढलं. धारणक्षमतेचा विचार न करता डोंगराळ भागात विकासाच्या नावाखाली अनिर्बंध कामं अशीच चालू राहिली, तर भूस्खलनाची समस्या वाढतच जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्न एकच… डोंगर पोखरून काढलं काय? जीव घाबरवून सोडणारा धोका?