नेवासा – नेवासा फाटा येथिल गुरुवारच्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना सातत्यानेच घडत आहेत. वकिल – डॉक्टर यांच्यासह अनेक व्यावसायिकांचे मोबाईल चोरी होत असल्याच्या वारंवार घडल्या आहे. याबाबत नेवासा पोलीसांना अनेकदा याची माहितीही देण्यात आली मात्र पोलीसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, आज गुरुवार (दि.५) रोजीच्या आठवडे बाजारात बाजार करत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकांच्या मोबाईलवरच चोरट्यांनी डल्ला मारला.
उपनिरिक्षक हे आठवडे बाजारात भाजी खरेदी करत होते. मुळा भाजीचा सौदा करत होते. १० रुपयात तीन मुळे विक्री करणारा सांगत होता तर उपनिरिक्षक साहेब पाच रुपयाचे तीन मुळे द्या असे सांगून सौद्यात सुत जमवत असतांनाच सराईत मोबाईल चोरांनी पोलीस उपनिरिक्षकांचाच मोबाईल लांबवत हात साफ केला. या घटनेमुळे पोलीस दलात चांगलेच चर्चेचे काहूर माजले आहे.
गुरुवारच्या आठवडे बाजारात दर गुरुवारी अनेकदा वकिल, डॉक्टर, व्यापारी, सरपंच यांचे कित्येकदा मोबाईल चोरी झालेले आहेत. याबाबत वारंवार पोलीसांकडे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली होती, मात्र नेवासा पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज चक्क बाजार करताना पोलीस उपनिरिक्षकांच्याच मोबाईलवर डल्ला मारल्यामुळे बाजारातही लोकांना हसू आवरता आले नाही आणि पोलीस ठाण्यातही ही वार्ता पसरल्यामुळे मोबाईल चोरीची चांगलीच चर्चा रंगत आहे.
पोलीस उपनिरिक्षकांना बाजारात मुळा खरेदी करतांना भाव कमी करण्याच्या नादात मोबाईलची चोरी होवून चक्क मुळा चांगलाच महागात पडला.