गंगटोक :- माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांच्या हमरो सिक्कीम पार्टीने (एचएसपी) सिक्कीम रिपब्लिकन पार्टीशी (एसआरपी) युती केली. (Bhaichung Bhutia’s HSP joins hands with Sikkim Republican Party) त्यामुळे पुढील वर्षी सिक्कीममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.
सिक्कीममध्ये वेळापत्रकानुसार एप्रिल 2024 मध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी एचएसपी आणि एसआरपी हे पक्ष आतापासूनच सज्ज झाले आहेत. किमान समान कार्यक्रम निश्चित करून त्या पक्षांनी युतीवर शिक्कामोर्तब केले.
सत्तारूढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला (एसकेएम) राज्यातील जनतेच्या भल्यासाठी काहीच करता आले नसल्याचे टीकास्त्रही नव्या युतीकडून सोडण्यात आले. एचएसपी आणि एसआरपी या पक्षांनी मागील निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती.
दोन्ही पक्षांना खातेही उघडता आले नव्हते. आता युतीमुळे त्यांची ताकद वाढणार आहे. पण, ती युती सिक्कीममधील प्रमुख पक्षांपुढे आव्हान उभे करणार का ते निवडणुकीनंतरच समजू शकेल. त्या राज्यात सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (एसडीएफ) हाही महत्वाचा पक्ष आहे. तो सध्या प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका सांभाळत आहे.