पुणे -एका महिला डॉक्टरने सहलीसाठी गुगलवर टेम्पो ट्रॅव्हल बसचा शोध घेतला. मात्र हा शोध घेणे तिला भलतेच महागात पडले. सायबर गुन्हेगाराने बस भाड्याने देण्याचा बहाणा करत त्यांच्या बॅंक खात्यातून 98 हजार रुपये परस्पर वर्ग करुन घेतले. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद 49 वर्षीय महिला डॉक्टर असून, हडपसर येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांना मैत्रिणींसोबत सहलीला जायचे होते. यासाठी त्यांनी गुगलवर टेम्पो ट्रॅव्हल बसचा शोध घेतला. यानंतर त्यांना महाराजा ट्रॅव्हलमधून बोलत असल्याचे सांगत एकाचा फोन आला. त्याने कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन एक फॉर्म भरण्यास सांगितले. यासाठी त्याने फिर्यादीच्या मोबाइलवर एक लिंक पाठवली. त्यांना गाडी राखीव ठेवण्यासाठी 101 रुपये रक्कम ऑनलाईन भरण्यास सांगितले.
फिर्यादीने लिंक ओपन करुन 101 रुपये भरले. यासाठी त्यांनी फॉर्ममध्ये सांगितल्याप्रमाणे डेबिट कार्डची माहिती भरली. यानंतर त्यांना लगेचच एका व्यक्तीचा फोन आला. त्याने फिडबॅक बॅंक भरायचा आग्रह करुन त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याच दरम्यान फिर्यादींच्या मोबाइलवर लागोपाठ मेसेज येऊ लागले. त्यांनी फोन कट करुन मेसेज बघितले असता, त्यांच्या बॅंकेतून आठ ट्रान्सजॅक्शनद्वारे 98 हजार रुपये कट झाल्याचे दिसले.