पुणे -पुणेकरांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. शहराचा वाढता विस्तार-रचना, वाहतुकीचा ताण अशा बाबी विचारात घेऊन वाहतूक कोंडीची सोडविण्यास प्राधान्य दिले. गुन्हेगारांना जरब बसवली. पुणेकरांचे प्रेम कायम स्मरणात राहिल. आता वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली. शहराचा विस्तार पाहता पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे आहे. आणखी पोलीस ठाण्यांची निर्मिती व्हायला हवी, असे गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी रात्री दिले. त्यानंतर गुप्ता यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात काम करताना नागरिकांनी सहकार्य केले. गणेशोत्सव आणि पालखी सोहळ्याचा बंदोबस्ताचा अनुभव शब्दांत सांगता येत नाही. या गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे नाही, असे गुप्ता यांनी सांगितले. पुणे शहर साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेले आहे. पुणेरी पाट्या आणि उपहासात्मक टीकेबद्दल ऐकले होते. गुंड टोळ्यांना जरब बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. आकडेवारीपेक्षा कारवाईला महत्व दिले. टोळ्यांच्या हालचालीवर करडी नजर ठेवून त्यांच्या विरोधात कारवाई केल्याचे गुप्ता म्हणाले. भरती प्रक्रियेतील गैरव्यवहाराचा सखोल तपास आरोग्य विभाग भरती, म्हाडा प्रश्नपत्रिका फूट, लष्करी भरती प्रश्नपत्रिका फूट तसेच आभासी चलन प्रकरणातील फसवणूक प्रकरणाचा तपास केला. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात आला. तपास करताना राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप झाला नाही. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याचे गुप्ता यांनी नमूद केले.