पुणे – आपल्या कर्तव्यगिरीची छाप मारण्यात अव्वल समजले जाणारे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंढे. काही दिवसांपूर्वीच त्यांची नियुक्ती राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. पदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच त्यांनी आपला “बाणा’ दाखविण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर विशेष नजर ठेवली असून, त्यांनी काढलेल्या फतव्याने सरकारला शेंडी लावणारी डॉक्टर मंडळी कोमात गेली आहेत.
नेमणूक शासकीय रुग्णालयात, मात्र सेवा खासगी रुग्णालयात…उशिरा येऊन, लवकर जाणे…दांडी मारत मस्टरवर उपस्थित असल्याचा शेरा मारणे आता डॉक्टरांसह अधिकाऱ्यांना महागात पडू शकते. कारण, यापुढे बायोमेट्रिक हजेरीपत्रकावरील हजेरी विचारत घेऊनच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यात येणार आहे. मुंढे यांनी नुकताच हा फतवा काढला आहे.
बायोमेट्रिक हजेरीपत्रकाशिवाय वेतन आणि भत्ते अदा करु नये, आहरण व संवितरण अधिकारी यांनी बायोमेट्रिक हजेरीपत्रकाशिवाय वेतन व भत्ते दिल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत. यामुळे दांडीबहाद्दर आणि गोलमाल करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
आयुक्त मुंढे यांनी याबाबतच्या सूचना नुकत्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार हे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यालयात राहून रुग्ण सेवा देत नसलेले वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी उपसंचालक कार्यालयास सादर करावी तसेच मुख्यालयात राहात नसलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता तातडीने बंद करण्यात यावा आणि प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, असेही पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, शासकीय सेवेत कार्यरत असलेले, आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसाय करीत असलेल्यांची यादीही द्यावी. तसेच ज्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नावे खासगी रुग्णालयाची नोंद आहे, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपशिलवार माहितीसह यादी सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्या
दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तातडीने माहिती सादर करावी. याबाबत दिरंगाई होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. दिरंगाई झाल्यास आपणास जबाबदार धरून पुढील योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.