पुणे -महामेट्रोकडून पुढील काही महिन्यांत वनाज ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या इंटरचेंज स्थानकापर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी गरवारे महाविद्याल ते इंटरचेंज स्टेशनपर्यंत घेण्यात आली मेट्रोची चाचणी गुरुवारी दुपारी यशस्वी झाली. त्यामुळे लवकरच मेट्रोची धाव वाढणार असून, पुणेकरांना आता वनाज तेशिवाजीनगरपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मेट्रो गरवारे स्थाकातून सुटली. डेक्कन स्थानक, छत्रपती संभाजी उद्यान स्थानक, पुणे महानगरपालिका स्थानक पार करून 3 वाजून 10 मिनिटांनी जिल्हा न्यायालयाच्या स्थानकात पोहचली. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी ट्रेनचे जल्लोषात स्वागत केले. या पूर्ण मार्गाची लांबी 2.74 किलोमीटर असून, त्यातील दीड किलोमीटरचा मार्ग हा मुठा नदीवरून आहे. या चाचणीसाठी ट्रॅक विभाग, व्हायाडक्ट विभाग, मेट्रो स्थानक विभाग, ट्रॅकशन विभाग, सिग्नल विभाग, टेलिकॉम विभाग, रोलिंग स्टॉक विभाग यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
लवकरच कोथरूड ते पिंपरी-चिंचवड
या चाचणीनंतर फुगेवाडी स्थानक ते जिल्हा न्यायालय स्थानकापर्यंत चाचणी घेण्यात येणार असून, यातील कृषी महाविद्यालय ते जिल्हा न्यायालय हा मार्ग भुयारी आहे. त्यामुळे लवकरच महामेट्रो भुयारी मार्गातील चाचणी घेणार आहे. या दोन्ही मार्गांच्या चाचण्या झाल्यानंतर केंद्राच्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून या मार्गांचे परीक्षण तसेच निरीक्षण झाल्याने पुढील काही महिन्यांत पुणेकरांना थेट कोथरूड ते पिंपरी-चिंचवडपर्यंत मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.