सेऊल – उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाने आज एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे दोन्ही कोरियांमध्ये संघर्ष भडकण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर तब्बल डझनभर क्षेपणास्त्रे डागली. त्यातील काही क्षेपणास्त्रे दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीमध्ये पडली. यानंतर दक्षिण कोरियानेही या क्षेपणास्त्रांना प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने (South hits back as North Korea fires most missiles in a day) आपल्या याच सागरी किनाऱ्यांजवळ क्षेपणास्त्र चाचणी घेतली.
उत्तर कोरियाने कालच अमेरिका आणि दक्षिण कोरियाला धमकी दिली होती. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने कोरियाच्या द्विपसमूहामध्ये सुरू केलेला आक्रमक युद्धसराव ताबडतोब थांबवावा, अन्यथा या दोन्ही देशांना त्याची भयानक किंमत मोजावी लागेल, असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. हा युद्धसराव म्हणजे घुसखोरीसाठीची तयारी असल्याचेही उत्तर कोरियाने म्हटले होते. या शाब्दिक चकमकीनंतर आज प्रत्यक्ष क्षेपणास्त्रे डागली गेली आहेत.
मात्र, दक्षिण कोरियाबरोबरच्या युद्धसरावातून उत्तर कोरियाला धमकावण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेच्यावतीने देण्यात आले आहे. उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षेला रोखण्यासाठी सर्व मित्र देशांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील अमेरिकेने केले आहे. उत्तर कोरियाने वेगवेगळ्या प्रकारची एकूण 10 क्षेपणास्त्रे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीजवळ डागली असल्याचे दक्षिण कोरियाच्या लष्कराने म्हटले आहे. यातील एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियापासून 167 किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळले. ही क्षेपणास्त्रे डागली गेल्यावर दक्षिण कोरियात सतर्कतेचा सायरन वाजवण्यात आला. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी भूमिगत बंगरमध्ये आश्रय घेतला. काही तासांनंतर दक्षिण कोरियाने हा सतर्कतेचा इशारा मागे घेतल्याचे जाहीर केले.
दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीजवळ आंतरराष्ट्रीय हद्दीत एक क्षेपणास्त्र पडले असले, तरी उत्तर कोरियाने प्रथमच इतक्या जवळ जाणारे क्षेपणास्त्र डागले आहे. ही आगळीक खपवून घेतली जाणार नाही, असे दक्षिण कोरियाने म्हटले आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे विमानातून उत्तर कोरियाच्या दिशेने डागली. उत्तर कोरियाबरोबर संघर्ष झाल्यास आपण मोठा विजय मिळवू असा विश्वासही दक्षिण कोरियाने व्यक्त केला आहे.
2010 मध्ये दक्षिण कोरियाच्या पश्चिम किनारपट्टीवर उत्तर कोरियाने डागलेल्या रॉकेटच्या माऱ्यामुळे 4 जण ठार झाले होते. मात्र तेव्हा रॉकेटचा मारा केला गेला होता. क्षेपणास्त्रांचा मारा केला गेला नव्हता. संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियावर क्षेपणास्रांच्या चाचण्या आणि वापरावर निर्बंध घातले आहेत.