नवी दिल्ली : बंगळुरुला जाणाऱ्या ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानाचा मोठा अनर्थ टळला आहे. दिल्ली विमानतळावर उड्डाणादरम्यान इंडिगोच्या विमानाच्या इंजिनला आग लागली होती. या घटनेनंतर हे उड्डाण रद्द करण्यात आले असून या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विमानातील १७७ प्रवासी आणि सात कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने ट्विटरवर पोस्ट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला आग लागल्याची माहिती विमानतळ नियंत्रण कक्षाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ पाऊलं उचलत या परिस्थितीवर विमानतळ कर्मचाऱ्यांकडून नियंत्रण मिळवण्यात आले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
#BREAKING #IndiGo flight 6E-2131 (Delhi to Bangalore) grounded at Delhi airport after a suspected spark in the aircraft | Watch @Atul_Bhatia80 pic.twitter.com/IwwRfdACQq
— shashwat bhandari (@ShashBhandari) October 28, 2022
या घटनेनंतर इंडिगो कंपनीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. “दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या ६E-२१३१ या विमानाला उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. वैमानिकाने हे उड्डाण तात्काळ रद्द केले.
या विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. या प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबदद्ल आम्ही दिलगीर आहोत”, असे ‘इंडिगो’ने म्हटले आहे.