धरमपूर (गुजरात) – गुजरात मध्ये भाजप पराभूत व्हावी अशी अनेक भाजप कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते गुप्तपणे आम आदमी पक्षासाठी काम करीत आहेत असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी केला आहे. शनिवारी गुजरातच्या अनेक शहरांमध्ये ज्या पोस्टरमध्ये त्यांना “हिंदूविरोधी” संबोधण्यात आले होते, त्यावरून भाजपवर निशाणा साधत ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल ( Arvind Kejriwal) म्हणाले की ही पोस्टर्स लावणारे लोक “राक्षस आणि कंसांचे वंशज” आहेत.
भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मला भेटतात आणि गुपचूपपणे मला सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी काहीतरी करण्यास सांगतात. मी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगू इच्छितो की ज्यांना त्यांच्या पक्षाचा पराभव करायचा आहे, त्यांनी ‘आप’साठी गुप्तपणे काम करावे. गुजरातमधील आदिवासीबहुल वलसाड जिल्ह्यात ते बोलत होते.
केजरीवाल ( Arvind Kejriwal ) म्हणाले की आम्हाला त्यांचा (भाजपचा) 27 वर्षांचा अहंकार मोडावा लागेल. मला माहित आहे की तुमचे व्यवसाय आहेत, तुम्ही आमच्यात सामील झालात तर ते तुमच्या व्यवसायाचे नुकसान करतील. तुम्ही तिथेच राहा, पण त्यांना पराभूत करण्यासाठी गुप्तपणे काम करा. भुतांचा नायनाट करण्यासाठी आगामी निवडणुकीत ‘आप’ला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
नव्या गुजरातसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. पक्षाची पर्वा करू नका, गुजरातसाठी काम करा, देशासाठी काम करा, आणि ‘आप’ एक नवीन वादळ, नवे राजकारण, नवे चेहरे, नवीन कल्पना आणि नवी पहाट आणेल असा दावा त्यांनी केला.भगवान श्रीकृष्णाने मला आशीर्वाद दिला आहे आणि कंसांच्या या वंशजांना संपवण्यासाठी मला त्यांनी विशेष कार्य देऊन पाठवले आहे. देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी, राक्षसांना संपवण्यासाठी तुम्ही मला साथ द्याल का?” असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.