नगर – सध्या राज्याच्या राजकारणात दसरा मेळाव्याचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त गर्दी जमविण्याची स्पर्धाच ठाकरे व शिंदे गटात सध्या सुरू आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. मेळाव्यासाठी मुंबईला पोहोचण्यासाठी वाहने बुक केली जात आहेत. या सगळ्यात मात्र नगरची एसटी दुर्लक्षितच राहिली आहे. राज्यभरातून 1800 एसटी मेळाव्यासाठी बुक केल्याचे सांगितले जात असले तरी नगर शहरातून मात्र एकही एसटी बस बुक केली गेलेली नाही.
शिंदे गटाने लोकांना मेळाव्याला आणण्यासाठी तब्बल 1800 एसटी बस बुक केल्याचे सांगितले जात आहे. गर्दी जमविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री आमदारांनी गेली पंधरा दिवस मतदारसंघ पिंजून काढला आहे. लोकांना मुंबईला नेण्यासाठी वाहनांचे बुकिंग केले जात आहे. आतापर्यंत राज्यभरातून तीन हजारांपेक्षा जास्त खासगी वाहने बुक केली गेली आहेत. तर प्रथमच 1800 इतक्या मोठ्या संख्येने एसटी बस बुक केल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटानेही खासगी बस बुक केल्या आहेत. यामध्ये मात्र नगरची एसटी दुर्लक्षित राहिली आहे. नगरमध्ये दोन्ही गटांकडून एकही एसटी बस बुक केलेली नाही, अशी माहिती शहरातील विभागीय कार्यालयातून देण्यात आली.
अन् उत्पन्नाची संधी हुकली
महामंडळाच्या नगर विभागाची आर्थिक परिस्थिती सध्या खराब आहे. कोविडची दोन वर्षे, कामगारांच्या संपामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बस नादुरुस्त असल्याने उभ्या आहेत.त्यात प्रवासीही कमी झाल्याने उत्पन्न घटले आहे. अशा आर्थिक संकटात नगरमधून काही बस मेळाव्यासाठी बुक झाल्या असत्या तर काही प्रमाणात उत्पन्नही मिळाले असते. हमखास उत्पन्न मिळण्याची संधी मात्र हुकली आहे.