इंदापूर (प्रतिनिधी) – नवरात्र उत्सवात महाभोंडला कार्यक्रम हा महिला वर्गाला उत्साह, प्रेरणा, नवीशक्ती देणारा व आनंदाचा दिवस असतो. हा योग जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले व संस्थेचे संस्थापक श्रीमंत ढोले यांच्या संकल्पनेतून लाखेवाडीसारख्या ग्रामीण भागात पार पडतो आहे. याचा मनोमन आनंद वाटतो, असा शाब्दिक गौरव खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी यांच्यावतीने शारदीय नवरात्र उत्सव या निमित्ताने, महाभोंडला कार्यक्रम आणि महिला मेळाव्याचे आयोजन बुधवारी (दि. 28) संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले यांनी केले होते. या मेळाव्याचा प्रारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थित महिलांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद साधत खासदार सुळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सारिकाताई भरणे, अनुराधा गारटकर, प्रतापराव पाटील, दीपक जाधव, शुभम निंबाळकर, सचिन सपकळ, अभिजीत तांबिले, छायाताई पडसळकर, अतुल झगडे, शिवाजीराव तरंगे, हनुमंत कोकाटे, सागरबाबा मिसाळ, नवनाथ रुपनवर, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व बावडा परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ढोले परिवाराला शिक्षणाचे महत्त्व कळाले असल्याने अशी सुंदर वास्तू लाखेवाडी गावात उभी केली आहे. जबाबदारी म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षण संस्था उभारून शैक्षणिक क्षेत्रातील काम या संस्थेचे नेत्रदीपक सुरू आहे. सर्व क्षेत्रातील घटकांना न्याय देण्याची भूमिका या संस्थेने ठेवल्याने महाभोंडला असे कार्यक्रम उत्साह देणारे सुरू आहेत; मात्र ज्यावेळेस असे प्रोग्रॅम असतात. त्यावेळेस आम्हाला कुठेतरी आंदोलन करायचे असते. नाहीतर कुठेतरी पक्ष संघटनेची मीटिंग असते, आम्ही कामे सगळी करतो; मात्र आयुष्याच्या छोट्या – छोट्या गोष्टी आनंद देणाऱ्या असतात. केवळ कामाच्या व्यापामुळे यापासून वंचित राहतो.
उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे यांनी केले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, चित्रलेखा ढोले, पौर्णिमा खाडे यांनी देखील त्यांचे बरोबर दांडीया खेळण्याचा आनंद खासदार सुळे यांनी घेतला.