प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 – मुसळधार पावसाच्या तडाख्यात पीएमपीच्या जवळपास 80 ई-बस विविध मार्गांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. ऑफिस सुटण्याच्या वेळीच बस बंद असल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती.
पाऊस आणि मंदगती वाहतुकीचा सर्वाधिक फटका ई-बसेसनाही बसला. शहरात सध्या 398 ई-बस धावत आहेत. त्यातील साधारण 20 टक्के बसेस पाऊसकाळात बंद होत्या. सामान्य बसच्या तुलनेत ई-बसची उंची कमी आहे. तसेच बॅटरी खाली असल्यामुळे पाणी जाण्याची भीती होती. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाणी ओसरेपर्यंत बसेस बंद ठेवल्या. पण, त्याच वेळी सीएनजी आणि डीझेल बस धावत होत्या असे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी सांगितले.
वीज गेली, चार्जिंग नाही; निगडीत 56 ई-बस बंद
पीएमपीच्या निगडी डेपोतील ई-बस चार्जिंगअभावी सोमवारी बंद ठेवण्यात आल्या आहेत. निगडी डेपोत रविवारी रात्री 9 वाजता वीज गेल्यामुळे डेपोतील बस चार्जिंग सुविधा बंद होती. सोमवारी सकाळपर्यंत वीज आलीच नाही. त्यामुळे बस बंद ठेवाव्या लागल्या. रात्री काही वेळ वीज आली, तेव्हा फक्त 14 बसच चार्जिंग झाल्या. त्यामुळे डेपोतील 56 बसेस सोमवारी दिवसभर बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.