प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 – मार्केट यार्डमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर आहे. मात्र, आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे दोडका, कारली, हिरवी मिरची, फ्लॉवर, काकडी आणि मटारच्या भावात वाढ झाली आहे. तर, केवळ सिमला मिरचीच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांनी प्रतिकिलो शंभरी गाठली आहे. त्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
येथील बाजारात रविवारी (दि. 21) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
दरम्यान, परराज्यांतून आलेल्या मालामध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरव्या मिरचीची 10 ते 12 ट्रक, कर्नाटक येथून कोबी 5 ते 6 ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, मध्य प्रदेश येथून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.
सातारी आल्याची 1000 ते 1200 पोती, भेंडीची 7 ते 8 टेम्पो, गवारची 7 ते 8 टेम्पो, टोमॅटोची 10 ते 12 हजार पेटी, फ्लॉवरची 8 ते 10 टेम्पो, कोबीची 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरचीची 10 ते 12 टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : 100-150, बटाटा : 170-210, लसूण : 50-400, आले सातारी : 100-350, भेंडी : 400-600, गवार : गावरान व सुरती 600-800, टोमॅटो : 120-160, दोडका : 450-550, हिरवी मिरची : 500-550, दुधी भोपळा : 150-250, चवळी : 300-400, कारली : हिरवी 400-450, पांढरी :300-350, पापडी : 450-500, पडवळ : 250-300, काकडी : 200-280, फ्लॉवर : 300-350, कोबी : 150-200, डिंगरी : 300-400, नवलकोल : 120-140, ढोबळी मिरची : 250-300, तोंडली : कळी 350-400, जाड : 180-200, शेवगा : 350-550, गाजर : 300-350, वालवर : 400-450, बीट : 100-120, घेवडा : 600-700, कोहळा : 100-150, आर्वी: 250-300, घोसावळे : 300-350, ढेमसे : 280-300, भुईमूग शेंग : 400-450, मटार : स्थानिक: 600-900, पावटा : 350-550, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 220-250, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.