प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 – शिलेदार कुटुंब आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे संगीतनाट्य क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या दिग्गज व्यक्तींची ओळख पुढील पिढीला व्हावी या दृष्टीने या लघुचित्रपटाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या “नाट्यब्रह्म’ च्या माध्यमातून संगीतनाट्य रंगभूमीच्या इतिहासाचे जतन झाले असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.
गंधर्वभूषण जयराम शिलेदार ट्रस्ट, संवाद पुणे आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने जयमाला शिलेदार यांच्या 96 व्या जन्मदिनी पूजनीय अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यावर आधारित “नाट्यब्रह्म’ या लघुचित्रपटाचे प्रकाशन अशोक सराफ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले, लघुपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शक दीप्ती भोगले, सुभाष सराफ, संवाद, पुणेचे सुनील महाजन, नंदकुमार काकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘नाट्यब्रह्म’ हा लघुचित्रपट दाखविण्यात आला.
दीप्ती भोगले यांनी “नाट्यब्रह्म’ची निर्मीती प्रक्रिया उलगडली. अभिनेते विजय गोखले आणि सुभाष सराफ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संवादचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले.