विजयकुमार कुलकर्णी पुणे, दि. 20 – खटल्याच्या कामकाजासाठी येणाऱ्या वकील, पक्षकारांच्या सोयीसाठी न्यायालयातील प्रत्येक कोर्ट हॉलच्या बाहेर “डिस्प्ले बोर्ड’ लावण्यात आले आहेत. मात्र, सध्या न्यायालयातील बहुतांश डिस्प्ले बोर्ड बंद असल्याचे दिसून येत आहे. ते धुळखात पडून तर आहेतच. मात्र, बंद असल्यामुळे नागरिक आणि वकिलांचीच गैरसोय होत आहे.
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये खटल्याच्या निमित्ताने दररोज शेकडो वकील, पक्षकार न्यायालयात येतात. लॉकडाऊनमुळे जिल्हा न्यायालयातील कामकाज नेहमीच्या तुलनेत कमी झाले होते. त्यावेळी न्यायालयात येणाऱ्या पक्षकार, वकिलांची संख्या घटली होती. मात्र, आता पूर्वीसारखे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे पुन्हा जिल्हा न्यायालय गजबजले असून न्यायालयात येणाऱ्या वकील, पक्षकारांची संख्या पूर्वीप्रमाणेच वाढली आहे.
पक्षकार, वकिलांना त्यांच्या खटल्याची माहिती सहज मिळावी यासाठी प्रत्येक कोर्ट हॉलच्या बाहेर डिस्प्ले बोर्ड बसवण्यात आले. मात्र, सध्या बहुतांश डिस्प्ले बोर्ड बंद आहेत. त्यामुळे खटल्याशी निगडीत माहिती घेण्यासाठी वकील, पक्षकारांना पुन्हा एकदा न्यायालयातील कोर्ट हॉलच्या दारावर लावण्यात येणाऱ्या पारंपरिक कागदी बोर्डाचा आधार घ्यावा लागत आहे. जर डिस्प्लेची सुविधा उपलब्ध आहे. तर ती बंद का, असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
न्यायालयात येणाऱ्या पक्षकार, वकिलांना खटल्यासंबंधीची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बसविण्यात आलेल्या “डिस्प्ले बोर्ड’चा उपयोग होताना दिसत नाही. मुळातच न्यायालयाबाहेर बसवण्यात आलेल्या डिस्प्ले बोर्डचा आकार छोटा असून, ते उंचीवर बसवण्यात आल्यामुळे त्यावरील माहिती वाचताना पक्षकार, वकिलांना अडचणी येतात. बहुतांशवेळा हे बोर्ड बंदच असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. याउलट कोर्ट हॉलच्या दारावर लावण्यात आलेल्या पारंपरिक बोर्डवर असलेल्या तारखा तपासणे सोपे जात आहे.
– ऍड. मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन