सातारा -मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून त्याच्या नावाने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून जमिनीचा करार केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे यांच्यासह साथीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आज दि. 12 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आ. गोरेंनी अनेकांना इशारे दिले. या प्रकरणात मला अडकवणाऱ्यांना सोडणार नसल्याचे सांगत त्यांनी दहिवडी तहसील कार्यालय व पोलीस प्रशासनावर तोफ डागली.
सातारा येथील विश्रामगृहात ते बोलत होते. याबाबत माहिती अशी, मायणी येथील भिसे नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही ते जिवंत असल्याचे भासवण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याप्रकरणी आ. जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण),
महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अन्य दोघांवर दि. 14 एप्रिल रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर वडूज येथील सत्र न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यावर आ. गोरेंच्यावतीने उच्च न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना आ. गोरे यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानप्रमाणे आ. जयकुमार गोरे हे स्वत:हून जिल्हा व सत्र न्यायालयात दि. 6 रोजी शरण आले होते. त्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना दोन्ही बाजूंनी वकीलांची तगडी फौज तैनात करण्यात आली होती.
न्यायाधीशांनी दि. 6 रोजी अंतरिम जामीन देताना पुढील सुनावणी दि. 11 रोजी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आ. गोरेंच्या बाजूने ऍड. हर्षद निंबाळकर तर फिर्यादीकडून ऍड. शरदचंद्र भोसले व सरकार पक्षाकडून ऍड. नितीन मुके यांनी युक्तीवाद केला होता.
दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी निकालासाठी आज (दि.12) तारीख ठेवली होती. त्यानुसार न्यायालयीन कामकाजाला सुरूवात करतानाच न्यायाधीशांनी आ. गोरे यांच्या जामीन अर्जावरील निकालाचे वाचन सुरू केले व त्यानंतर जामीन मंजूर केल्याचे आदेश दिले. त्यानंतर “या प्रकरणात माझी सही जुळली असे पसरवले जात असले तरी त्यावरील अंगठा माझा नसल्याचे कोणी सांगायला तयार नाही, अशी खंत आ. गोरे यांनी व्यक्त केली. तसेच याप्रकरणात चुकीच्या पद्धतीने काम करून मला अडकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, यंत्रणा यापैकी प्रत्येकाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.