मुंबई – भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर गुरुवारी भारतीय रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत तब्बल 26 पैशानी वाढून रुपयाचा भाव 79.65 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. बुधवारी रुपयाचा भाव 13 पैशांनी कमी झाला होता. रुपयाच्या दरात सुधारणा होत असल्याबद्दल एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, अमेरिकेने व्याजदरात केवळ 0. 75% ची वाढ केली आहे. यापेक्षा जास्त व्याजदर वाढ झाली असती तर भारतीय रुपयाच्या मूल्यावर नकारात्मक परिणाम झाला असता.
मात्र अजूनही कच्च्या तेलाच्या किमती 105 डॉलर पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे रुपयावरील दबाव कायम आहे. जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होत नाहीत, तोपर्यंत भारतीय रुपयावरील दबाव कायम राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
रुपयाचे मूल्य जास्त प्रमाणात घसरू नये यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यांमध्ये बऱ्याच उपाय योजना केल्या आहेत. बॅंकेने परकीय चलनातील भारतातील ठेवीवर व्याजदरात वाढ जाहीर केली आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूकदारांना भारतीय कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी काही सवलती जाहीर केल्या आहेत.
याच्या सकारात्मक परिणामाबरोबरच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू केल्यामुळे रुपयाला आधार मिळत असल्याचे त्यांनी सुचित केले. मात्र आगामी काळात भारताला चालू खात्यावरील तूट आणि व्यापारी खात्यावरील तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. अन्यथा रुपयाच्या मूल्यावर त्याचा नकारात्मक परिणाम संभवतो असे त्यांनी सांगितले.