नवी दिल्ली – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात केवळ 0.75 टक्केची वाढ केली आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये जास्त व्याजदर वाढ होणार नाही असे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे इतर बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारावर या घडामोडीचा सकारात्मक परिणाम होऊन सोने आणि चांदीचे दर वाढले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 592 रुपयांनी वाढवून 51,750 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर तब्बल 1,335 रुपये वाढून 56,937 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारातही सोन्याचा दर वाढून 1,747 डॉलर व चांदीचा दर 19.38 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
या संबंधात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सोने आणि चांदीत गुंतवणूकदार करणाऱ्या गुंतवणूकदारांचे लक्ष फेडरल रिझर्व्हकडे होते. रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे केवळ 0.75% ची व्याजदर वाढ केली आहे. जर यापेक्षा जास्त व्याजदर वाढ केली असती तर डॉलर आणखी बळकट होऊन रुपयांच्या मूल्यावर परिणाम होण्याची शक्यता होती.
गेल्या काही दिवसापासून इतर जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य कमी होत आहे. आता हे मुल्य एक तर सध्याच्या पातळीवर राहील किंवा कमी होईल. त्यामुळे डॉलरमधील काही गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. मात्र भारत सरकारने सोन्याची आयात कमी व्हावी या करिता सोन्यावरील आयात शुल्क वाढवून 15 टक्के केले आहे. त्यामुळे भारतातील सोन्याचे दर इतर देशातील सोन्याच्या दरापेक्षा जास्त पातळीवर आहेत.
…….