मुंबई – पंजाबमधील आम आदमी पार्टीचे सरकार मोहल्ला क्लिनिक सुरू करणार आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 ‘मोहल्ला क्लिनिक’ जनतेसाठी सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. हे मोहल्ला दवाखाने शहरी आणि ग्रामीण भागात सुरू होतील. या मोहल्ला क्लिनिकमध्ये सर्व प्रकारचे उपचार, चाचण्या आणि औषधे मोफत उपलब्ध असतील. सध्या पहिल्या टप्प्यात 75 मोहल्ला क्लिनिक सुरू होणार आहेत. त्यानंतर असे आणखी दवाखाने सुरू केले जातील.
पंजाबमधील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिवही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले की, ग्रामीण भागात आधीच 3000 आरोग्य सेवा केंद्रांचे जाळे आहे. जे सामुदायिक आरोग्य अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचार्यांद्वारे चालवले जात आहेत,असेही त्यांनी सांगितले. या उपकेंद्रांचे मोहल्ला क्लिनिकमध्ये रूपांतर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
भगवंत मान यांनी अधिकाऱ्यांना जवळपास पाच ते सहा गावांचे क्लस्टर तयार करून त्याच्या मध्यभागी मोहल्ला क्लिनिक उभारण्यास सांगितले. यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना मोहल्ला दवाखान्यात सहज प्रवेश मिळेल आणि मोठ्या संख्येने लोकांना याचा फायदा होईल. मोहल्ला क्लिनिकमध्ये सेवा देण्यास इच्छुक असलेल्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांची कंत्राटी पद्धतीने सेवा घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सचिवांना सांगितले आहे.