नवी दिल्ली – NEET-PG परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. 21 मे रोजी होणारी NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. असे करणे म्हणजे परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 2021ची मेडिकल पीजी प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे 2022ची परीक्षा काही काळ पुढे ढकलण्यात यावी. अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती.
NEET PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने केली होती. IMA ने आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांना पत्र लिहून NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. NEET PG 2022 ची परीक्षा 21 मे रोजी घेतली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून, NEET PG 2021 समुपदेशनाला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत होते. त्यानंतर आयएमएनेही आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे येत्या 21 मे रोजी घेतली जाणाऱ्या परिक्षेमध्ये कोणताही बदल होणार नाही हे या निकालावरून स्पष्ट होत आहे.