नवी दिल्ली – मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही वार्षिक 100 अब्ज डॉलर कमावणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. 2021-22 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 60,705 कोटी रुपयांवर पोहोचला. यामुळे कंपनीचे उत्पन्न 7.92 लाख कोटी रुपये (102 अब्ज डाॅलर) पर्यंत वाढले आहे. 100 अब्ज डाॅलर पेक्षा जास्त महसूल वाढवणे हे कोणत्याही भारतीय कंपनीसाठी स्वप्नासारखे यश आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
रिलायन्सच्या म्हणण्यानुसार, तेल व्यवसायातील नफा, दूरसंचार आणि डिजिटल सेवांमध्ये सातत्याने वाढ आणि रिटेल व्यवसायातील मजबूत गतीमुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला पाठवली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा 22.5 टक्क्यांनी वाढून 16,203 कोटी रुपये झाला आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वितरित करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीच्या बोर्डाने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 8रुपये च्या लाभांशाची शिफारस केली आहे. कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश देयकावर निर्णय अपेक्षित आहे.
तेल ते दूरसंचार क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला 2020-21 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत 13,227 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचा ब्रँड जिओचा नफा चौथ्या तिमाहीत जवळपास 24 टक्क्यांनी वाढून 4,173 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुकेश अंबानी हे प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचे मुलगा आहे. वडिलांनंतर भाऊ अनिल अंबानी यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला. ते यशाच्या उंबरठ्यावर असताना अनिल अंबानी जवळजवळ कंगाल झाले आहेत.
मुकेश अंबानींना सध्या देशातच गौतम अदानी यांच्या समूहाकडून आव्हान मिळत आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रिलायन्सला मागे टाकत अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. अदानी यांनी जेफ बेझोस आणि एलोन मस्क यांच्यासोबत या यादीत आपले स्थान निर्माण केले. या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावाचाही समावेश आहे.