देऊळगावराजे -देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. येथील खासगी दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देऊळगावराजे परिसरात तपासणी करण्यात आली असता डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.
येथील घरातील साठवणुकीच्या स्वच्छ पाण्यामध्ये आळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्याच्या साठवणुकीची भांडी रिकामी करावीत. कोरडा दिवस पाळवा म्हणजेच त्या दिवशी सर्व पाण्याची भरलेली भांडी रिकामी करण्याची गरज आहे. ताप, अशक्तपणा, थंडी वाजून येणे आदी डेंग्यूची लक्षणे आहेत.
डेंग्यूसदृश आजारात डेंग्यूची तपासणी केल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ओषधोपचार घेणे आवश्यक आहे. तसेच देऊळगाव राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यूच्या रुग्णांना उपचारासाठी लागणारी ओषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी भक्ती ताटे यांनी केले आहे.