मुंबई – उमरान मलिक व भुवनेश्वर कुमार यांच्या भेदक गोलंदाजीनंतर फलंदाजांनी केलेल्या जबादारी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 7 गडी राखून पराभव केला. यासह हैदराबादने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपला सलग चौथा विजय साकार केला.
– उमरान मलिकचे 4 बळी
– भुवनेश्वरचे 3 बळी
– मार्करम व पूरनची अखंडित भागीदारी
– त्रिपाठी व शर्माचीही उपयुक्त खेळी
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत पंजाबला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मात्र, भूवनेश्वर व मलिकच्या गोलंदाजीसमोर त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी नांगी टाकली. मधल्या फळीतील फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याला थोडीफार साथ देत शाहरुख खान व ओडेन स्मिथने फलंदाजी करत संघाला दीडशतकी धावांची मजल मारुन दिली.
लिव्हिंगस्टोनने आपल्या 60 धावांच्या खेळीत 33 चेंडूत 5 चौकार व 4 षटकार फटकावले. शाहरुख खानने 26 तर स्मिथने 13 धावा केल्या. मलिकने 4 तर भूवनेश्वरने 3 गडी बाद केले. मिलकने टाकलेल्या अखेरच्या षटकात 4 फलंदाज बाद झाले. त्यापैकी मलिकने 3 फलंदाजांना बाद केले तर अर्शदीप सिंग धावबाद झाला.
4️⃣rcing our way up the table. 😎#PBKSvSRH #OrangeArmy #ReadyToRise #TATAIPL pic.twitter.com/wxM6Z03LBn
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 17, 2022
विजयासाठी आवश्यक 152 धावा हैदराबादने 19 व्या षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केल्या व विजय प्राप्त केला. कर्णधार व सलामीला फलंदाजीला आलेल्या विल्यमसनने निराशा केली. मात्र, अभिषेक शर्माने 25 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 31 धावा केल्या. त्याने राहुल त्रिपाठीसह संघाला अर्धशतकी मजल मारुन दिली.
त्रिपाठी 22 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 34 धावांवर बाद झाल्यावर शर्माही परतला. त्यानंतर मात्र, एडन मार्करमने निकोलस पूरनसह संघाचे आणखी नुकसान होऊ न देता 75 धावांची अखंडित भागीदारी केली व संघाचा विजय साकार केला. मार्करम 27 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावत 41 धावांवर नाबाद राहिला तर, पूरनने नाबाद 35 धावांची खेळी करताना 30 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. पंजाबकडून राहुल चहरने 2 तर कागिसो रबाडाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत सर्वबाद 151 धावा. (लियाम लिव्हिंगस्टोन 60, शाहरुख खान 26, ओडेन स्मिथ 13, उमरान मलिक 4-28, भुवनेश्वर कुमार 3-22). सनरायझर्स हैदराबाद – 18.5 षटकांत 3 बाद 152 धावा. (राहुल त्रिपाठी 34, अभिषेक शर्मा 31, एडन मार्करम नाबाद 41, निकोलस पूरन नाबाद 35, राहुल चहर 2-28, कागिसो रबाडा 1-29).