पुणे – मद्यविक्री दुकाने, परमिटरूम, बिअरबार या दुकानांना देवदेवता, महापुरुष, नामवंत व्यक्ती तसेच गड-किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतचा शासननिर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील 125 परमिट रूम आणि 108 बिअरशॉपी दुकानांना नावे बदलण्याच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाकडून दिल्या आहेत.
अनेक मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना देवदेवता, राष्ट्रपुरूष आणि गड-किल्ले यांची नावे दिली जातात. राज्यातील गड-किल्ले हे राज्याच्या इतिहासाचे साक्षीदार असून, त्यांचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे.याबाबत लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांच्याकडून अशा प्रकारची नावे देण्यास प्रतिबंध करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दि.30 जूनपर्यंत नावे बदलण्यासाठी मुदत असणार आहे.