वाल्हे -करोनामुळे गेल्या दोनवर्षांपासून निर्बंधांच्या जाचामुळे लग्नसराईवर विरजण पडले होते. त्यामुळे लग्नसराई हंगामावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल झाले होते; मात्र आता निर्बंधमुक्त झाल्याने लग्नसई धुमधडाक्यात होत आहेत. पुरंदर तालुक्यात लग्नसईवर अवलंबुन असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा अर्थगाडा पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. दरम्यान, यंदा एप्रिल ते जुलै महिन्यांत तब्ब्ल 48 मुहूर्त असल्याचे सचिन देशपांडे यांनी सांगितले.
करोनाकाळात पुरंदर तालुक्यात सरासरी 20 ते 25 मंगल कार्यालय, तसेच पूरक घटकांना सुमारे तीन ते चार कोटी रुपयांना फटका बसला होता. विशेषत: सासवड, नीरा, जेजुरी आदी भागातील घटकांचा समावेश होता. दरम्यान, आता निर्बंध उठले असल्याने मंडप, मंगल कार्यालये, वाजंत्री, केटरर्स, सजावट, फुलवाले, फोटोग्राफर, घोडेवाले, बॅन्जो यांचा आर्थिक गाडा रुळावर आला असून त्यांना ऑर्डरही मिळत आहेत.
यातून हजारो जणांच्या हाताला कामेही मिळाली आहेत. मागील दोन वर्षी, अनेक हौशी लोकांनी देखील कार्यक्रम साधेच केले होते. मंगल कार्यालयात किमान लोकांच्या उपस्थित कार्यक्रम उरकले. मंडप व्यवसायातील मजुरांची परवड होत होती. मात्र, यावर्षी अनेक ठिकाणी व्यवसाय मिळत असून, यावर्षी सुगीचे दिवस आले असल्याचे, मंडप व्यावसायिक शोधन गायकवाड यांनी सांगितले.
कर्जांचे हफ्ते थकले
मागील दोन वर्षी लग्नसराई सुरू होण्याआधी बॅंड, डि. जे, फोटोग्राफर व्यावसायिकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून अत्याधुनिक साधनांची खरेदी केली. व्यावसायिकांना कामच नसल्यान घरप्रपंच चालवायचा का कर्जाचे हप्ता भरायचे, असा प्रश्न उभा ठाकला होता. यावर्षी लग्न मुहूर्त जास्त असल्याने व्यवसायाला आलेली मरगळ दूर होईल, अशी आशा फोटोग्राफी व्यावसायिक किशोर कुदळे, रोहित भुजबळ यांनी व्यक्त केली.
करोनामुळे लग्नसराईत वधू-वरांचे, घरातील सर्वांचे कपडे, आहेराच्या साड्या अशी मोठी उलाढाल बंद झाली होती. रुखवतीचे साहित्य, भांडी, फर्निचर हे सर्व देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. सध्या लग्न धुमधडाक्यात होत असून, खरेदीसाठी ग्राहक येत आहेत.
– विलास लंबाते, कापड व्यावसायिक, वाल्हे
कला कौशल्याच्या जोरावर हे कलाकार कुटुंबाचे पोट भरतात. मात्र, मिरवणुका, लग्नकार्यावर करोनामुळे बंधने आल्यामुळे कलाकारांच्या आमदनीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी लग्नसराईला जोरदार सुरूवात झाल्याने, यावर्षी तरी आर्थिक नुकसान होणार नाही.
– संतोष गायकवाड, वाद्य, घोडे व्यावसायिक