भोपाळ – मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास येथील निवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी स्फोट झाला. या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जखमींना शिवपुरी आणि गुना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी बहुतांश एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार, जिल्हाधिकारी, एसपी घटनास्थळी पोहोचले होते.
शिवपुरीचे जिल्हाधिकारी अक्षय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेतील इमारतीमधून दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचवेळी 3 गंभीर जखमींना गुना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताबाबत सध्या कारखान्यात उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क होऊ शकला नसल्यामुळे अपघाताचे नेमके कारण सांगता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, फटाक्यांच्या साहित्यामुळे आग लागण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
बदरवास पोलीस ठाण्याचे प्रभारी राकेश शर्मा यांनी दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, घटनास्थळावरून दोन मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आले, तर इतर चार जण गंभीररीत्या भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीमुळे 25 जण भाजले असून त्यापैकी 19 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पप्पू खान आणि बबलू खान फटाके बनवण्याचे आणि फटाक्यांची किरकोळ विक्री करण्याचे काम करतात. लग्नसराईचा मोसम असल्याने दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके होते. फटाक्यांच्या दुकानाला मंगळवारी दुपारी अचानक आग लागल्याने स्फोटाची परिस्थिती निर्माण झाली आणि या ठिकाणी काम करणारे लोक त्याच्या विळख्यात आले. दुकानदाराचे परवाना असलेले गोदाम सुमेळा गावात असल्याचे सांगितले जाते. दुकानासोबतच घरातही फटाके ठेवल्याचे समोर आले आहे.
सध्या बचाव पथक घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहे. फटाक्यांच्या दारूगोळ्यामुळे आग सातत्याने पसरत असल्याचेही समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानही आगीवर नियंत्रण मिळवत आहेत.