पुणे- पुण्यात एका खासगी रुग्णालयात झालेल्या किडनी तस्करी प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीने ससूनमधील अवयव प्रत्यारोपण समिती सदस्यांची कसून चौकशी केली.
पैशांचे अमिष दाखवून किडनी काढून घेतली आणि त्याचा मोबदला दिला नाही. तसेच त्या ऑपरेशनच्यावेळी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे प्रकरण सध्या पुण्यात चर्चेत आहे. याप्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये संबंधित रुग्णालयाला राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कारणेदाखवा नोटीस बजावून 24 तासांत उत्तर देण्याविषयी आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित रुग्णालयाने उत्तरही दिले.
या प्रकरणी आम्ही दोषी नसून, प्रत्यारोपणासाठी जी समिती नेमलेली असते त्या समितीनेच कागदपत्रांची पडताळणी करायची असते अशी भूमिका रुग्णालयाने घेतली. या प्रकरणी राज्य सरकारने नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीने शुक्रवारी ही चौकशी केली. यामध्ये किडनीदाता आणि घेणारा यांच्यामधील नातेसंबंध तपासले. तसेच किडनी प्रत्यारोपणाला परवानगी देणाऱ्या ससूनमधील विभागीय किडनी प्रत्यारोपण समितीच्या सदस्यांची प्रश्नांचा भडिमार करत चौकशी केली.
याशिवाय समितीच्या हाती लागलेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी अवयव प्रत्यारोपण समितीशिवाय संबंधित खासगी रुग्णालयातील जबाबदार व्यक्तींचीही चौकशी केली आहे. यामध्ये ससून रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण समितीतील सर्व सदस्यांचे स्वतंत्रपणे जबाबही नोंदवून घेतले.