खडकवासला –गेल्या महिन्यात काही शाळा सुरू झाल्या. तर, आता शैक्षणिक सत्र संपत आले आहे. नवे शैक्षणिक सत्र जूनपासून सुरू होणार आहे. असे असताना काही खासगी शाळांनी मात्र विद्यार्थ्यांना नवा “युनिफॉर्म’ सक्तीचा केला आहे. त्यामुळे खरेदीसाठी ऐन उन्हाळ्यात पालकांना धावाधाव करावी लागत आहे.
काही खासगी शाळांनी आता अचानक गणवेश घेण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना केल्या आहेत. त्यामुळे पालकवर्ग कापड दुकानांकडे जात आहे. पण, दुकानांत विद्यार्थ्यांसाठी “युनिफॉर्म’ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. कोठे पॅंट मिळतो, तर शर्ट नाही. तर, कोठे शर्ट आहे, तर पॅन्ट नाही अशी स्थिती आहे. पी.टी.चा ड्रेस आहे, तर टी-शर्ट मिळत नाही, अशी कैफियत पालक मांडत आहेत.
काही पालकांनी तीन-तीन वेळा दुकानांत चौकशी करूनही “युनिफॉर्म’ मिळालेला नाही. शिवाय, ज्या ठिकाणी गणवेश उपलब्ध आहे, तेथे रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. काही व्यावसायिकांशी याबाबत चर्चा केली असता, “आम्हांला काहीही सूचना न देता शाळांनी विद्यार्थ्यांना “युनिफॉर्म’बाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही अचानक कापड कोठून आणणार? शाळांनी योग्य नियोजन केल्यास या समस्या येणार नाहीत.’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
काही खासगी मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या हजारापुढे आहे. परंतु संबंधित दुकानांची क्षमता इतक्या कमी वेळात विद्यार्थ्यांना युनिफॉर्म उपलब्ध करून देण्याची नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
स्टेशनरी एकाच ठिकाणी मिळाव्यात
युनिफॉर्मसोबतच विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या स्टेशनरीचीदेखील अडचण आहे. एक सेट एकाच ठिकाणी पूर्ण उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक वर्गातील पूर्णपणे सेट मिळत नसल्याने पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.