कोलंबो : करोनाच्या दोन वर्षाच्या महामारीने श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशात आतापर्यंतच्या सर्वात भीषण परिस्थितीतील नागरिकांना तोंड द्याव लागत आहे. त्यातच आता श्रीलंका सरकारमधील सर्वच्या सर्व २६ मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एकीकडे सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला असताना महिंदा राजपक्षे मात्र पंतप्रधानपदी कायम आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळण्यात आले आहे.
देशातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली असून या भेटीमुळे पंतप्रधान राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाचे निर्णय घेतली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
I have informed the sec. to the President of my resignation from all portfolios with immediate effect, in hope that it may assist HE & PMs decision to establish stability for the people & the govt of #LKA. I remain committed to my voters, my party & the people of #Hambanthota.
— Namal Rajapaksa (@RajapaksaNamal) April 3, 2022
श्रीलंकेचे क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण राष्ट्रपतींच्या सचिवांना राजीनामा दिल्याची माहिती दिल्याची माहिती दिली आहे. श्रीलंकेचे माजी मंत्री विमल यांनीही राष्ट्रपतींची भेट घेतली आणि देशावर असलेल्या संकटाचे निराकरण करण्यासाठी सर्वपक्षीय अंतरिम सरकार नियुक्त करण्याचा प्रस्ताव दिला.
३६ तासांच्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल आणि सरकारविरोधी मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशाच्या पश्चिम प्रांतात रविवारी ६०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. रविवारी होणाऱ्या या नियोजित आंदोलनापूर्वी, आठवडाअखेर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा भंग करून, आपले नेते साजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाचे खासदार शनिवारी कोलंबोतील ‘स्वातंत्र्य चौकाकडे’ निघाले होते.
अभूतपूर्व आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या सरकारविरोधी मिरवणुकीपूर्वी सरकारने देशव्यापी आणीबाणी जाहीर करून ३६ तासांची संचारबंदी लागू केली होती. याशिवाय व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर बंदीही लागू केली, मात्र रविवारी ती मागे घेतली.