लखनौ – सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनण्यास सज्ज झालेल्या योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत (2017) घवघवीत यश मिळवून भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता काबीज केली. त्यानंतर योगी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यावेळी ते खासदार म्हणून लोकसभेचे प्रतिनिधित्व करत होते.
मुख्यमंत्री बनल्यानंतर खासदारकीचा राजीनामा देऊन ते विधान परिषदेचे सदस्य बनले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही बाजी मारत भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता राखली. स्वत: योगीही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. आता ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा 25 मार्चला होणार आहे.