अनारक्षित डब्यांची सेवादेखील पूर्ववत होणार
पुणे – पुणे – मुंबई मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंटरसिटी, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेसला अखेरीस मासिक सिझन तिकीट धारकांना प्रवास करता येणार आहे. तर या एक्स्प्रेससह सिंहगड एक्स्प्रेसला 22 मार्चपासून अनारक्षित डबे जोडण्यात येणार आहे. मात्र प्रवासासाठी लसीकरणाची अट कायम ठेवण्यात आली आहे.
करोनामुळे रेल्वेमध्ये केवळ तिकीट आरक्षित केलेल्या नागरिकांनाच प्रवास करता येत होता. तर इंटरसिटीसाठीच्या सिझन तिकिटाला देखील मागील 2 वर्षांपासून स्थगिती दिली आहे. आता एक्स्प्रेसला जनरल डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने जनरल तिकीट देण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र लसीकरण पूर्ण झालेले (दोन्ही डोस), युनिव्हर्सल पासधारक नागरिकांनाच तिकिटे मिळणार आहे. तर 18 वर्षांखालील प्रवाशांनी वयाचा पुरावा आणि वैद्यकीय कारणास्तव लसीकरण न केलेल्या प्रवाशांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तर प्रवाशांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असेल.
———————