नारायणगाव- जुन्नर तालुक्याचा अस्मितेचा विषय असलेला बिबट सफारी बारामतीला नको; तर जुन्नरलाच झाली पाहिजे, अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे. या मागणीसाठी मेलो तरी हटणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्यामुळे येणाऱ्या काळात जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी शिवसेना व राष्ट्रवादीत कळीचा मुद्दा ठरणार यात शंका नाही.
जुन्नरचा भौगोलिक परिसर बिबट्यांसाठी अनुकूल असल्याने तालुक्यात बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून येते. शिवाय बिबट्यांचा जटील प्रश्न जुन्नरमध्ये असताना बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. बिबट सफारी जुन्नर तालुक्यात व्हावी यासाठी 2016पासून शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी मंत्री, मुख्य सचिव यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आहेत.
त्यानंतर वनविभागाच्या मुख्य सचिवांनी पाहणी करून आंबेगव्हाण येथील साडेसहा हेक्टर जागेची निश्चित केली; मात्र ही जागा योग्य नसल्याचा कोणताही अहवाल नसताना बिबट सफारी जुन्नर तालुक्यात न होता बारामतीत गेल्यामुळे बिबट सफारीच्या विषयाने शिवसेना-राष्ट्रवादीत घमासान होण्याची शक्यता आहे.
बिबट सफारी बारामतीकडे नेण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नसून ती जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी मी केलेलं काम वाया जाऊ देणार नाही. येथील बिबटे गोळा करून बारामतीला न्यायचे आणि त्यावर उद्योग व्यवसाय तुम्ही करायचे हे कदापि होऊ देणार नाही. बारामतीला जंगल सफारी करून त्यात उंट, घोडे, हत्ती सगळे प्राणी आणा; परंतु आमचा बिबट्या आम्ही तिकडे नेऊ देणार नाही, असे शिवसेनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले.
जुन्नरसाठीच आग्रही -आमदार बेनके
जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे. जीएमआरटी प्रकल्प असल्याने तालुक्यात औद्योगिकीकरण होऊ शकत नाही. तालुका पर्यटन विकासासाठी गती घेत असून बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. बिबट्या विरुद्ध मानव संघर्ष येथे सतत पाहायला मिळतो. तालुक्यात 350 बिबटे असून प्रत्येक गावात शिवारात वाड्या-वस्त्यांवर आढळून येतात. गेल्या दहा वर्षांत 200 लोकांचा मृत्यू तर 350 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यासाठी नैसर्गिक न्याय भूमिकेतून बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी, ही माझी ठाम मागणी आहे. असे आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत सांगितले.