पुणे : 11 गावांआधी होणार 23 गावांचा ‘डीपी’

पुणे – महापालिका हद्दीत 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांचा विकास आराखडा अजूनही अपूर्ण तयार आहे. मात्र, त्यानंतर समाविष्ट झालेल्या 23 गावांचा आराखडा जाहीर झाला असून, त्यावर सुनावणीही सुरू आहे. त्यामुळे गावांचा नियोजनात्मक विकास सुरू झाला तरी 11 गावांच्या विकासाला मुहूर्त कधी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, करोनामध्ये दोन वर्षे गेल्याने आता महापालिकेस शासनाने या गावांच्या आराखड्यासाठी 22 जून 2022 पर्यंतची मुदत दिलेली आहे.
राज्यशासनाने दि. 4 ऑक्टोबर 2017 मध्ये महापालिकेत लोहगाव (उर्वरित), उर्वरित हडपसर- साडेसतरा नळी, मुंढवा केशवनगर, उंड्री, आंबेगाव खुर्द, बुद्रुक, शिवणे, शिवणे-उत्तमनगर, धायरी (काही भाग), उरुळी देवाची आणि फुरसुंगी पूर्ण या गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जवळपास वर्षभराने पुणे महापालिकेने 4 ऑक्टोबर 2018 मध्ये या गावांसाठी विकास आराखडा करण्याचा इरादा जाहीर केला. त्यानंतर मागील तीन वर्षांत विविध निवडणुका आणि नंतर करोनामुळे आराखड्याचे काम रखडले आहे. त्यामुळे या गावांच्या विकासला खीळ बसली आहे.
असे असतानाच, अवघ्या पाच महिन्यांपूर्वी महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आराखड्याला गती मिळाली आहे. ही गावे 23 गावे पालिकेत आली असली तरी त्याच्या विकास आराखड्याचे काम पीएमआरडीएकडून सुरू असल्याने शासनाने हे काम त्यांच्याकडेच ठेवले होते. त्यामुळे, हा आराखडा वेगाने मार्गी लागला असून आता त्यावर हरकती आणि सूचनांची सुनावणी सुरू झाली आहे. वर्षभरात तो मान्यही केला जाईल. त्यामुळे 11 गावांच्या आधी 23 गावांचा आराखडा मार्गी लागेल.
आरक्षणासाठी जागाच नाहीत?
11 गावांच्या विकास आराखड्यात महापालिकेने या गावांसाठी पीएमआरडीएने केलेल्या ईएलयू (प्रत्यक्ष जागा वापर) माहिती पालिकेने घेतली आहे. त्यानंतर पालिकेने या 11 गावांमध्ये सर्वेक्षण करत पीएलयू ( प्रस्तावित जागा वापर) निश्चित करून त्यानुसार आरक्षणे टाकली जाणार आहेत. मात्र, आरक्षणांसाठी 10 ते 15 टक्के जागा कमी पडत असल्याची प्रशासकीय चर्चा आहे. त्यामुळे ही कमी पडणारी आरक्षणे विद्यमान जागा वापराच्या ठिकाणी टाकावी लागणार असल्याने आराखड्याची प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे. मात्र, हा आराखडा रखडल्याने या 11 गावांचा विकास रखडला आहे.





