मुंबई – कज्ञालच्याप्रमाणे आजही पेटीएम कंपनीचा शेअर तब्बल 13 टक्क्यांनी गडगडला. कालही या कंपनीचा शेअर 13 टक्क्यानी कोसळला होता. तांत्रिक प्रणालीत त्रुटी आढळल्याने रिझर्व्ह बॅंकेने पेटीएम पेमेंट्स बॅंकेवर नवीन ग्राहक जोडण्यावर आणलेली बंदीचे नकारात्मक परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी या समभागाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली.
रिझर्व्ह बॅंकेने पेटीएम पेमेंट्स बॅंकेला त्रयस्थ कंपनीमार्फत तिच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचे समग्र परीक्षण करून घेण्याचेही आदेश दिले आहेत. नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदीच्या कारवाईमागील कारण म्हणजे बॅंकेने परदेशातील सर्व डेटा प्रवाहित करण्याची परवानगी दिल्याचे आणि नियमांचे उल्लंघन केल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा तऱ्हेने चिनी कंपन्यांना भारतातील ग्राहकांचे तपशील पुरविले गेल्याचीही बाजारात वदंता आहे. पेटीएमने मात्र हे सर्व आरोप चुकीचे व अतिरंजित असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत.
पेटीएम पेमेंट्स बॅंकेवर 2017 सालातील कार्यान्वयनापासून आजतागायत मध्यवर्ती बॅंकेकडून तीन वेगवेगळय़ा प्रसंगी दंडात्मक कारवाई केली गेली आहे. नवीन खाती उघडण्याला बंदी केली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. पेटीएम पेमेंट्स बॅंकेत पेटीएमचे संस्थापक-प्रवर्तक विजय शेखर शर्मा यांचा व्यक्तिश: 51 टक्के भागभांडवली हिस्सा असून, उर्वरित 49 टक्के भागभांडवली मालकी पेटीएमकडे आहे.