मुंबई – सरलेल्या आठवड्यामध्ये बरेच खरेदी होऊन निर्देशांक वाढले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात घाऊक आणि किरकोळ महागाई वाढली आहे. त्याचबरोबर दोन दिवसात फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांकडून बरीच आज विक्री झाली. त्यामुळे मंगळवारी शेअर निर्देशांकात घट झाली.
गेल्या पाच दिवसापासून शेअर बाजार निर्देशांक वाढत होते. मात्र त्यामध्ये खंड पडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 709 अंकानी कमी होऊन 55,776 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 208 अंकांनी म्हणजे 1.23 टक्क्यांनी कमी होऊन 16,663 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बॅंक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बॅंक, एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट नोंदली गेली. मात्र अशा परिस्थितीतही महिंद्रा, मारुती सुझुकी, नेस्ले, एशियन पेंट्स या कंपन्याच्या शेरच्या भावात वाढ झाली.
जागतिक शेअर बाजारातून निर्देशांकांना आधार मिळाला नाही. हॉंगकॉंग, युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक चालू आहे. त्या बैठकीकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेमध्ये महागाई 40 वर्षाच्या उच्चांकावर आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये महागाई कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये व्याजदर वाढीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे डॉलरच्या माध्यमातून गुंतवणूक करणारे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार वेगाने विकसित होणाऱ्या देशातून गुंतवणूक काढून घेत आहेत. भारतातूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालू आहे. काल या गुंतवणूकदारांनी 176 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रशिया- युक्रेन युद्ध कशा प्रकारे वळण घेते याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे सांगण्यात आले.
……….