विश्रांतवाडी : मराठी ही आपली मातृभाषा आहे. ती टिकलीच पाहिजे पण इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. आपल्या मुलांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शाळा योग्यरितीने चालवण्याकरता संस्था चालकांनीही बारकाईने लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.
लोहगाव येथील ब्रिलियंट स्कुलच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन व माजी सभापती अशोक खांदवे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार कमल ढोले-पाटील, ज्येष्ठ नेते पांडुरंग खेसे, प्रकाश म्हस्के, माधव काळभोर, नगरसेवक अभिषेक बारणे, सभापती अरुण चौधरी, ब्रिलियंट स्कुलचे संस्थापक बाळकृष्ण खांदवे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन गरुड, मंगल जंगम, रत्नमाला तळेकर, माजी उपसरपंच प्रीतम खांदवे, हरिदास मोझे, सुभाष काळभोर, स्वाती खांदवे, विजय खांदवे, दत्तात्रय खांदवे, हेमलता शिंदे या मान्यवरांसह लोहगावकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अशोक खांदवे म्हणाले, अजितदादा पवार यांच्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हवेली पंचायत समितीचे दोनदा नेतृत्व करता आले. शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे म्हणून ब्रिलियंट स्कूलची स्थापना केली. या शाळेत सुरुवातीला केवळ साठ विद्यार्थी शिक्षण घेत होते, आज सहा वर्षांच्या काळात या शाळेचा वटवृक्ष झाला असून याठिकाणी शेकडो विद्यार्थी माफक दरात केंद्रीय बोर्डाचे शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा ठिगळे यांनी केले. तर मुख्याध्यापिका एनी जॉन यांनी आभार मानले.
हवेली पंचायत समितीचे अशोक खांदवे यांना दोनवेळा सभापती पद सांभाळण्याची संधी मिळाली होती. त्यातून त्यांनी या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास केला. अत्यंत शांत, संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सामान्य वर्गातील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.शाळेची इमारत लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी खुली करावी अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.