बीड – शुन्यातून विश्व निर्माण करणारे अनेकजण आहेत. त्यात आता बीड जिल्ह्यातील शिदोड येथील ज्ञानेश्वर देवकतेची भर पडली आहे. बिकट परिस्थितीवर मात करत मजूरी, हमाली करून शिक्षण घेऊन तो पीएसआय बनला आहे. ज्ञानेश्वरच्या घरी केवळ साडेतीन एकर जमीन आहे. आई-वडील, भाऊ, बहीण असा त्याचा परिवार आहे. आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. ऊसतोडीसाठी ते जायचे. अशा परिस्थितीत आई-वडिलांच्या सोबत दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून तसेच कृषी केंद्रावर खताचे पोते उचलत हमाली करून ज्ञानेश्वरने आपले शिक्षण पूर्ण केले. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने पोलीस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
ज्ञानेश्वरच्या या यशाचा गावकऱ्यांनाही खुप आनंद झाला. गावकऱ्यांनी त्याची घोड्यावरून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गावभर मिरवणूक काढली. ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावात तर पदवीपर्यंतचे शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्याने दुसऱ्याच्या शेतात मजूरी करून तेसच काही दिवस कृषी केंद्रात हमाली करून त्यातून मिळालेल्या पैशातून शिक्षण पूर्ण केले. दिवसरात्र अभ्यास करून त्याने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने 248 गुण मिळव फौजदार होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्या या यशामुळे कुटुंबासह ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
दररोज 11 तास अभ्यास करायचा ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर 2018 पासून दररोज सकाळी 10 ला बीडला आल्यावर रात्री 9 वाजताच परत गावी जायचा. दिवसभर अभ्यासिकेत बसून तो अभ्यास करत असे. रात्री घरी गेल्यावर आणि सकाळी उठल्यावरही हाती पुस्तक असायचे. शारीरिक चाचणीसाठीही सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा तो सराव करत असे. याआधी धावण्यात कमी गुण मिळ्याल्याने त्याचे फौजदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. यातून धडा घेत त्याने धावण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत ज्ञानेश्वर पीएसआय बनूनच थांबला.
खाकी वर्दी अंगावर असावी, हे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. आज माझे स्वप्न पूर्ण होतेय. आई-वडील, नातेवाईक आणि विशेष म्हणजे मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच मी ‘स्टार’ झालो, अशी भावना ज्ञानेश्वर देवकतेने व्यक्त केली आहे.