पिंपरी – मीडियाचे कॅमेरे समोर दिसले की काही जण बोलायला सुरुवात करतात. मात्र, मी त्यापैकी नाही असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाव न घेता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
मनसेच्या पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते (गुरुवारी) मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष, नगरसेवक सचिन चिखले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे जवळपास पाऊन तास जनसंपर्क कार्यालयात थांबले होते. त्यांनी शहरातील पक्ष संघटनेचा संपूर्ण आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, मी पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड शहरात आलो नाही. आठवड्याभरात मी परत पुण्याला येणार आहे. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये येईल. तुमच्यासोबत संवाद साधेल हा माझा शब्द असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे यांनी पुण्यात बोलताना संजय राऊत पत्रकार परिषदेत काहीही बोलतात असे सांगून त्यांची नक्कलही केली होती.
त्यावर राऊत यांनी मी ईडीने बोलविल्यानंतर आम्ही गप्प बसणाऱ्यातले नाहीत असे बोलून प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा राज ठाकरे यांनी कॅमेरा समोर दिसला की बोलणाऱ्यांमधील मी नाही असे म्हणत नाव न घेता अप्रत्यक्षपणे राऊत यांना सणसणीत टोला लगाविला. शहर मनसे कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे शहरात आल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.