Election Results : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली असून आता हळूहळू चित्र स्पष्ट होताना दिसतंय. ५ पैकी ४ राज्यांमध्ये भाजप आघाडीवर असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार कोणत्या राज्यात कोणता पक्ष बहुमताच्या जवळ जाईल व पाच राज्यांमध्ये बहुमताचा आकडा काय आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. राज्यात बहुमतासाठी २०२ चा आकडा पार करावा लागणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजप व मित्रपक्षांना उत्तर प्रदेशात २७३ जागांवर आघाडी आहे. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत या आकडेवारीमध्ये मोठा उलटफेर न झाल्यास उत्तर प्रदेशात भाजप बहुमताचा आकडा सहज पार करेल. भाजप पाठोपाठ येथे समाजवादी पक्ष व मित्रपक्ष मिळून १२२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस व बहुजन पक्षाची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक असल्याचे दिसत असून बसपा ५ तर काँग्रेस २ जागांवर आघाडीवर आहे.
पंजाब : पंजाबमध्ये यंदा मोठा उलटफेर झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जादू केली असून ११७ विधानसभा उमेदवार असलेल्या राज्यात आपचे ९१ उमेदवार आघाडीवर आहेत. पंजाबमध्ये बहुमतासाठी ५९ उमेदवारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. आतापर्यंतचे कल लक्षात घेता पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सत्तास्थापन करण्यास काही अडचण येईल असे वाटत नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला राज्यात ७७ जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेसचे उमेदवार केवळ १७ जागांवर आघाडीवर आहेत. शिरोमणी अकाली दल ६ जागांवर आघाडीवर आहे.
गोवा : गोव्यामध्ये काँग्रेस व भाजप दरम्यान जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आतापर्यंत जी आकडेवारी हाती आली आहे, त्यानुसार गोव्यात काँग्रेस भाजपसमोर मोठं आव्हान उभा करू शकल्याचे दिसत नाहीये. राज्यात भाजपने ४० जागांपैकी १९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ११ जागांवर पुढे आहे. गोव्यामध्ये यंदा तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षाने देखील नशीब आजमावले होते, मात्र त्यांच्या खात्यात देखील फारसं काही पडल्याचं दिसत नाहीये. आपला दोन जागांवर आघाडी मिळाली आहे, तर तृणमूल व मित्रपक्षांचे ३ उमेदवार आघाडीवर आहेत. गोव्यामध्ये बहुमताचा आकडा २१ इतका आहे.
मणिपूर : मणिपूर येथे विधानसभेच्या ६० जागा असून येथेही भाजपनेच आघाडी घेतली आहे. भाजपला राज्यात १९ जागांवर आघाडी असून येथे बहुमतासाठी ३१ चा आकडा गाठावा लागणार आहे. नाग पीपल फ्रंट ७ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.
उत्तराखंड : उत्तराखंड येथील विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपला ४१ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस येथे २५ जागांवरील आघाडीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तराखंडमध्ये बहुमतासाठी ३६ चा आकडा पार करावा लागेल.