वाई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय साहाय्यकाचे नाव सांगून जमीन व्यवहारात फसवणूक केल्याची घटना ताजी असताना, पुण्यात आणखी एक घटना घडली आहे. अजितदादांच्या स्वीय साहाय्यकाशी ओळख असल्याचे सांगून पुण्यातील वारजे यथील महेश पटवर्धन यांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रवीण विठ्ठल जगताप (रा. केंजळ, ता. वाई) याला अटक केली आहे. याप्रकरणी जगतापसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकासकामे केली जातात. त्यापैकी पाच कोटी रुपयांचे बजेट लॉक करून देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय साहाय्यक मुसळे यांच्याशी ओळख आहे.
तुमचे काम होऊन जाईल, असे प्रवीण जगताप आणि त्याच्या साथीदाराने महेश पटवर्धन यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून पटवर्धन यांनी संशयितांना दहा लाख रुपये दिले; परंतु ते काही काम करत नसून आपली फसवणूक झाल्याचे पटवर्धन यांच्या लक्षात आले. त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.