एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ
पिंपरी (प्रतिनिधी) – एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सांगवी येथे शनिवारी (दि. 26) रात्री घडली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
संजय बंकट सरवदे (वय 43, रा. एसटी कॉलनी, जुनी सांगवी) असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरात पत्नी, मुलांसोबत जेवण झाल्यानंतर ते बाथरूमध्ये गेले.
बराच वेळ झाले तरी वडील बाहेर येत नसल्याने मुलांनी बाथरूमचा दरवाजा ढकलून पाहिलं असता संजय यांनी गळफास घेतल्याच दिसून आले. मुलांनी त्यांना त्वरीत रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
संजय सरवदे हे वल्लभनगर एसटी आगारात काम करत होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. आत्महत्येच्या या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
संजय यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, एसटी बंदच्या आंदोलनामुळे ते तणावात होते, असे सांगण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह मूळगावी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.