बंगळूरू – जिल्हा आणि सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती मल्लिकार्जुन गौडा यांनी गेल्या महिन्यात रायचूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात व्यासपीठावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून टाकला होता. त्यावरून प्रचंड गदारोळ माजला असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी या प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शनिवारी बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये जमलेल्या हजारो आंदोलकांच्या बैठकीनंतर बोम्मई यांनी ही घोषणा केली.
दलित संघर्ष समितीच्या नेत्यांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी न्यायाधीश गौडा यांच्या निलंबनाची मागणी केली. शहर रेल्वेसमोर जमलेल्या हजारो आंदोलकांनी संविधान संरक्षण महा ओक्कुटा (एसएसएमओ) च्या नेतृत्वाखाली विधान सौधा चलो आणि उच्च न्यायालय चलोच्या घोषणा देत मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी हातात निळे झेंडेही घेतले होते.
आंदोलकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. या कृत्याविरुद्ध कारवाई केली जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र काढून टाकल्याच्या घटनेबाबत दलित समाजाच्या नेत्यांनी मला सविस्तर समजावून सांगितले आहे. याबाबत मी संबंधित लोकांशी चर्चा करून लवकरच पत्र लिहिणार आहे.
डॉ. आंबेडकरांचा झालेला अपमान निंदनीय आहे. आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्याचा अपमान करणारे कोणतेही कृत्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाऊ नये. डॉ.आंबेडकरांची प्रतिष्ठा आणि सन्मान राखण्यात आम्ही आघाडीवर आहोत. आम्ही संविधानानुसार न्याय देऊ. दरम्यान, मल्लिकार्जुन गौडा यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच गौडा यांची कर्नाटक राज्य परिवहन अपीलीय न्यायाधिकरण, बेंगळुरूचे पीठासीन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.