मुंबई – शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे गुरुवारी निधन झाले आहे. ते 81 वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालवली होती. त्यांना कोरोनाचा संसर्गही होऊन गेला होता. सुधीर जोशी यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच करोनाच्या आजारातून घरी परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा अस्थिर झाली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेची जडणघडण आणि पक्ष संघटनेत सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. सुधीर जोशी यांनी मुंबई महापौर ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहे. 1999 मध्ये सुधीर जोशी यांनी आजारपणामुळे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.