संगमनेर (प्रतिनिधी) – विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिची छेड काढण्याचा प्रयत्न झाला.त्यावेळी तिच्या मदतीसाठी धावलेल्या दोघांवर प्राणघातक हल्ला केल्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी सात जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी (दि.11) सकाळी साडेअकराच्या सुमारास शहरालगतच्या प्रवरा परिसरातील एका महाविद्यालयाजवळ घडला. कासारवाडीतील एक विद्यार्थिनी महाविद्यालयातून आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाली. त्याचवेळी साई मंदिराच्या दिशेने पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अनिकेत दळे, अनिकेत मंडलिक व एका अल्पवयीन मुलासह अन्य चार जणांनी त्या विद्यार्थिनीची छेड काढली. तू कोठे चालली आहेस’ अशी विचारणा करीत माझ्या गाडीवर बस’ असे म्हणत चक्क तिच्या डोक्यावर टपली मारली.
त्याच्या सोबत असणारा अनिकेत मंडलिक त्याच्याही पुढे निघाला. त्याने तू खूप सुंदर दिसतेस, मला फार आवडतेस’ असे म्हणत तिचे केस ओढण्यापर्यंत व त्यानंतर लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करण्यापर्यंत त्याची मजल गेली.त्या अल्पवयीन मुलासह बाकी चौघे यावेळी शिट्ट्या वाजवून त्या एकट्या विद्यार्थिनीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी विद्यार्थिनीचा चुतल भाऊ आणि त्याचा मित्र आपल्या बहिणीच्या मदतीला धावला. यावेळी त्याने या गुंडांना तुम्ही माझ्या बहिणीला का छेडता?’ असा सवाल काय केला असता गुडांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
अनिकेत दळेने विद्यार्थिनीच्या चुलत भावाची कॉलर पकडून खिशातला चाकू काढला आणि त्याच्या गळ्यात खुपसण्यासाठी त्याच्यावर वार केला, मात्र ऐनवेळी तो मागे सरकल्याने त्याचा निशाणा हुकला मात्र घसरता वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी अनिकेत दळे, अनिकेत मंडलिक व एका अल्पवयीन (नाव निष्पन्न) मुलासह अन्य अज्ञात चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.