पटियाला – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पुन्हा त्यांच्या पटियाला शहर मतदार संघातून नशिब अजमावत असून यावेळी त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कन्या इंदर कौर यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. 56 वर्षीय इंदर कौर यांच्या म्हणण्यासुनार हा मतदार संघ आपल्या कुटुंबाचा पारंपारीक बालेकिल्ला असून येथे आम्हाला विजय मिळणे अजिबात अशक्य नाही. अमरिंदरसिंग हे पटियालाच्या पूर्वीच्या राजघराण्याचे वंशज आहेत. त्यांनी 2002, 2007, 2012 आणि 2017 मध्ये या मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विजय मिळवला आहे.
कॉंग्रेस मधून बाहेर पडलेले अमरिंदरसिंग यांनी पंजाब लोक कॉंग्रेस हा स्वताचा वेगळा पक्ष स्थापन केला आहे. ते सध्या अन्य उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असल्याने त्यांच्या कन्या त्यांच्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. त्यांनी म्हटले आहे की आमच्या वडिलांनी या भागात जो सर्वांगिण विकास केला आहे त्या आधारावर आम्ही येथे मते मागत आहोत.
या मतदार संघात भाजपचही आम्हाला येथे पुर्ण मदत मिळत आहे असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्रीपदाच्या काळात गेल्या चार वर्षात आम्ही या मतदार संघातील विकासकामांवर 1800 कोटी रूपये खर्च केले आहेत असा दावा अमरिंदरसिंग यांनी येथील एका सभेत बोलताना केला आहे. या मतदार संघात अमरिंदरसिंग यांच्या विरोधात कॉंग्रेसचे विष्णू शर्मा, शिरोमणी अकाली दलाचे हरपाल जुनेजा आणि आम आदमी पार्टीचे अजित पाल सिंग कोहली हे प्रमुख उमेदवार आहेत.