किरीट सोमय्यांचे आरोप पवारांनी फेटाळले
पुणे -“शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही,’ असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले. “पारदर्शकता ठेवून अधिकाऱ्यांनी काम केले. यामध्ये सगळ्यांना सूचना दिल्या, की यात पारदर्शक काम केले पाहिजे. जम्बो कोविड सेंटरमध्ये राजकीय कुठलाही पदाधिकारी न घेता सगळे अधिकारी होते,’ असे पवार यांनी यावेळी सांगितले.
विधानभवन येथे करोना आढावा बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून आरोप केले. यावर विचारले असता पवार म्हणाले, “राज्य सरकार, जिल्हा वार्षिक नियोजन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा निधी जम्बो हॉस्पिटल उभारण्यामध्ये आहे.
त्यात पुणे विभागीय आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि जिल्हाधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांचा जम्बोच्या कामामध्ये समावेश होता. आढावा बैठकीत पहिल्यांदा त्यावरच चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी हे काम कसे केले आहे याची माहिती देण्यात आली आहे. कोविड सेंटरच्या बाबतीत काहीही चुकीचे होऊ दिलेले नाही.’
खासदार उदयनराजे भोसले यांच्या भेटीविषयी विचारले असता पवार म्हणाले, “पक्षप्रवेशासाठी ही भेट झालेली नाही. सातारा शहर हद्द वाढ झाली आहे. काही विकास कामे होती त्याबद्दल चर्चा झाली.’ मुंबईमध्ये मंत्री आदित्य ठाकरे समवेत केलेल्या पाहणी दौऱ्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी चांगले काम केले आहे. आम्ही कोणालाही न सांगता हा दौरा ठरविला होता. युवा नेतृत्व चांगले काम करत आहेत. अनेक वर्ष कोणी लक्ष घातले नव्हते, तेथे आदित्य ठाकरे यांनी चांगली कामे केली आहेत. मला कामाचा अनुभव आहे. त्यानुसार मला ज्या योग्य वाटल्या त्या सूचना त्यांना केल्या.’
अण्णांच्या पत्राची सरकारकडून दखल
किराणा दुकानांतून वाइन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याबाबत पवार म्हणाले, “अण्णा हजारे यांच्या पत्राची सरकारने दखल घेतली असून प्रधान सचिव हे अण्णांना भेटणार आहेत. विभागीय आयुक्तांनी देखील भेट घेतली आहे. वाइन विक्रीबाबात हरकती मागवलेल्या आहेत.’