भारतात करोना आणि ओमायक्रॉनचे संकट निवळत चालले असून, देशात आणखी एक लाट येणार हा विविध तज्ज्ञांचा अंदाज साफ चुकलेला आहे. महाराष्ट्रात तर लवकरच लॉकडाऊन पूर्णतः मागे घेतले जाईल, असे काही मंत्रीच सांगू लागले आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असूनही सुदैवाने आता तरी करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत नाही. वर्षभरात परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, जानेवारी 2021 मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारत दौऱ्यावर येणार होते; परंतु त्यावेळी तेथील करोना महामारी वाढत असल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला. करोना संकटावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असते, तर जॉन्सन येथे येऊ शकले असते आणि 28 वर्षांनंतर भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे झाले असते. त्याआधी 1993 मध्ये ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. 20 मे 2020 रोजी, ब्रिटनमध्ये लॉकडाऊन सुरू असताना जॉन्सन हे स्वतःच्या वाढदिवसाच्या गार्डन पार्टीत सामील झाले होते. ही पार्टी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती.
लॉकडाऊनच्या नियमांचा पंतप्रधानच भंग करत असतील, तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा रास्त सवाल टीकाकार करू लागले. या पार्टीची माहिती उशिराने बाहेर आली, तेव्हा जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी मजूर पक्षाने केली. खुद्द जॉन्सन यांना दोनदा करोना झाला होता आणि तरी त्यांचे बेजबाबदारपणाचे वर्तन थांबले नव्हते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील पदावर असताना अनेक महिने स्वतः मास्क लावत नव्हते. महाराष्ट्रातील एका मराठी बाण्याच्या राजकीय पक्षाचे प्रमुख “मास्कबिस्क लावण्याची काहीही गरज नाही’, असे सांगत बिनधास्तपणे फिरत होते. पुढे त्यांनाही करोना झाला. तिकडे जॉन्सन यांना घरी पाठवून पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची निवड करावी, असा सूर आळवला जाऊ लागला. ऋषी हे इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांचे जावई असून, ते ब्रिटनचे विद्यमान वित्तमंत्री आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले.
ब्रिटनमधील राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी “गोल्डमन सॅक्स’ या जगप्रसिद्ध कंपनीत उच्चपदावर काम केले होते आणि त्यानंतर स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनीही सुरू केली होती. जॉन्सन यांच्या पार्टीगेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सु ग्रे या महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. ग्रे यांनी या प्रकरणाची चौकशी करून तयार केलेल्या अहवालात तीनशे फोटो आहेत. त्यात जॉन्सन हे बियरचा ग्लास उंचावताना दिसत असून, ऋषी यांच्या हातात शीतपेयाचा ग्लास आहे. वास्तविक पंतप्रधानांनीच करोनाला आळा घालण्यासाठी ब्रिटनमध्ये कडक निर्बंध घातले होते. घरामध्येही कोणत्याही प्रकारचे उत्सव वा पार्ट्या साजऱ्या करू नये, असे त्यात म्हटले होते; परंतु भारतात ज्याप्रमाणे सामान्यांना एक नियम आणि नेत्यांना दुसरा नियम असे चालते, तसेच ब्रिटनमध्ये घडले आहे. या स्थितीत पार्टीगेट प्रकरणात पंतप्रधानांच्या धोरणप्रमुख मुनिका मिर्झा, चिफ ऑफ स्टाफ डॅन रॉजेनफोल्ड, मुख्य खासगी सचिव मार्टिन रेनॉल्ड आणि संचार संचालक जॅक डॉयल यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पार्टीगेट प्रकरणाबद्दल जॉन्सन यांनी माफी मागितली असून, माझ्या सरकारवर विश्वास ठेवा, यापुढे गोष्टी नक्की सुधारतील, असे आश्वासन दिले आहे.
भारतात कृषी कायदे मागे घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकारे माफी मागितली नाही. आम्ही काही गोष्टी पटवून देऊ शकलो नाही, असे ते म्हणाले होते. तर संबंधित अहवाल येण्यापूर्वी, आम्ही नियम नेहमीच पाळतो असा दावा जॉन्सन हे करत होते. प्रत्यक्षात त्यांनी नियमभंग केलाच. शिवाय 2020 आणि 2021 मधील इतर डझनभर पार्ट्यांबाबतचे अहवालातील निष्कर्ष पोलिसांच्या विनंतीवरून रोखण्यात आले आहेत. कारण पोलीस या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. या प्रकरणात एप्रिल 2021 मध्ये प्रिन्स फिलीपच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन मेळाव्यांचाही समावेश आहे. यासंबंधीचे निष्कर्ष पुढे आल्यानंतर जॉन्सन यांच्यासमोरील अडचणीत वाढ होऊ शकते. खुद्द सत्ताधारी हुजूर पक्षातील काही खासदारांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे असून, लोकशाहीचेच द्योतक आहे. आपल्याकडे मात्र सध्या केंद्र सरकारमधील एकही मंत्री विरोधी मत व्यक्त करण्याचे धाडस करत नाही. कारण तसे धाडस केल्यास आपली काय हालत होईल, हे त्यांना माहीत असते! जॉन्सन यांनी आपल्याच सरकारने बनवलेले
नियम पायदळी तुडवले. हजारो लोक मृत्यूशी झुंज देत असताना, स्वतःचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. शिवाय ते खोटेही बोलले. असा गृहस्थ देशाचे नेतृत्व करण्यास पात्र नाही, असे हुजूर पक्षातीलच अनेक खासदारांचे मत असल्यास त्यात चूक ते काय! यापुढे 10 डाउनिंग स्ट्रीट (पंतप्रधानांचे निवासस्थान) मधील कारभार सुधारण्याचा प्रयत्न मी करेन, असे आश्वासन देणारी पत्रे जॉन्सन यांनी सर्व खासदारांना पाठवली आहेत. मात्र, करोना महामारीत पार्ट्या करण्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आणि सरकारची प्रतिमा डागाळली, हे स्पष्ट आहे. परंतु पक्षाच्या अनेक खासदारांनी जॉन्सन यांच्या नेतृत्वाबद्दल अविश्वास व्यक्त करणारी पत्रे संबंधितांना पाठवली आहेत. आज ब्रिटनने जगात लसीकरणात अग्रस्थान पटकावले आहे. तेथील लसीकरणाचे व्यवस्थापनही उत्तम आहे. तरीदेखील लॉकडाऊनचे नियम मोडणे आणि दारूच्या पार्ट्या करणे यासाठीच जॉन्सन यांची कारकीर्द ओळखली जाईल, असे दिसते. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी जॉन्सन कायम राहणे हे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे.