पुणे -(कल्याणी फडके) पुणे-सातारा मार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्याच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. टोल रकमेपोटी पीएमपीला दरमहा सुमारे 80 हजार मोजावे लागत असल्याने हा खर्च तिकीटात वाढवला आहे. विशेष म्हणजे याबाबत प्रवाशांना पूर्वसूचना देण्यात आली नाही. ही भाडेवाढ सरसकट नसून, केवळ टोलनाक्यामार्गे ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी आहे. त्यामुळे टोलनाक्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता 1 रुपया मोजावा लागत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीबाहेर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सेवा देण्यात येते. उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने ही सेवा देण्यात येते. त्यापैकी लोणावळा आणि पुणे-सातारा रस्ता या मार्गांवर टोलनाके आहेत. पुणे-सातारा रस्त्यावरून कात्रज-सारोळा, कात्रज-सासवड, कात्रज-वांगणी, कात्रज-विंझर या चार मार्गांच्या बसेस धावतात. या मार्गांवर प्रामुख्याने दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
जानेवारी 2019 च्या दरम्यान टोलची थकीत रक्कम न भरल्याने टोलनाका प्रशासनाकडून बसेस टोलनाक्याच्या पुढे सोडण्यात येत नव्हत्या. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने स्थानिक आमदारांच्या मध्यस्थीच्या मदतीने टोलच्या रकमेबाबत तोडगा काढला होता. मात्र, आता पुन्हा टोलनाक्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपासून टोलनाका ओलांडून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एक रुपया जादा रक्कम तिकीट दरात आकारण्यात येत आहे.
टोल रकमेचा प्रश्न यापूर्वीदेखील निर्माण झाला होता. त्यावेळी बसेसची सेवा खंडीत केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागांतील काही वाहनांना टोल नाक्यांवर सूट दिली आहे. मात्र, प्रवाशांना सवलतीच्या दरात सेवा देणाऱ्या पीएमपीला मोठ्या प्रमाणावर टोल आकारण्यात येतो. सध्या पीएमपीला टोलसाठी स्वत:जवळील पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे बसेसलादेखील टोल माफ करणे आवश्यक आहे. केवळ टोलनाका ओलांडून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्याच तिकीट रकमेत एक रुपया वाढला आहे.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
…तर अधिकचा रुपया द्यावा लागणार…
पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील किंवा पुण्याकडे येणाऱ्या बसमधील प्रवाशांना टोल नाका ओलांडल्यास एक रुपया अधिकचे तिकीट आकारले जाणार आहे. मात्र, टोलनाक्यापूर्वीच उतरणाऱ्या नागरिकांना एक रुपयाचा भुर्दंड पडणार नाही.