नवी दिल्ली,- टेस्लाने गाड्या भारतीय बाजारात विकायच्या आणि नोकऱ्या इतर देशात तयार करायच्या असा प्रकार आम्हाला अमान्य असल्याचे, असे अवजड उद्योग मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी म्हटले आहे.
कोणत्याही कर सवलतींचा विचार करण्याआधी टेस्लाने स्थानिक पातळीवर उत्पादन करणे आवश्यक असल्याचे सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे. लोकसभेत टेस्लावरील प्रश्नाला उत्तर देताना, गुर्जर यांनी पुन्हा एकदा सरकारची भूमिका अधोरेखित केली. आमच्या सरकारचे धोरण आहे की जर भारतातील बाजारपेठेचा वापर करायचा असेल तर भारतीयांना नोकरीच्या संधी द्याव्या लागतील.
त्या कंपनीने सरकाच्या पॉलिसीनुसार अर्ज केलेला नाही. पॉलिसीनुसार अर्ज केला तर भारताचे दरवाजे खुले आहेत. भारतात कंपनी स्थापन करा, नोकऱ्या द्या, सरकारच्या महसुलात वाढ करा. भारत सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना चालना दण्यात येत आहे. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहेत.
मर्सिडिज बेन्झ, ऑडी, जग्वॉर लॅंड रोव्हर आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार निर्मात्यांनी उत्पादने आणली आहेत. टाटा मोटर्स, ह्युंदाई आणि एमजी मोटर इंडियाच्या इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी काही राज्य सरकारांनी तत्परतेने टेस्ला कंपनीला आमंत्रण दिले होते. पश्चिम बंगालपासून पंजाब आणि महाराष्ट्र सरकारने निमंत्रणे पाठवली आहेत. मात्र आयात कर कपातीसारखे महत्त्वपूर्ण घटक केवळ केंद्र सरकारच ठरवू शकते.